जागृत हा अत्यंत खमंग, वापरास सुटसुटीत व नैसर्गिक असा गूळ आहे जो आपल्या दैनंदिन आहारात असलेली साखर संपूर्णपणे बदली करू शकतो. तसेच ह्या पासून वैविध्य पूर्ण अनेक पदार्थ बनविले जाऊ शकतात. आमच्या पाककृती तज्ञांनी स्वतः करून बघितलेल्या खालील काही पाककृती आपण नक्कीच करून बघाल.

English
...

बटर स्पॉंज केक

साहित्य :

मैदा १२० ग्रॅ., १२० ग्रॅ. गुळाची पावडर, बेकिंग पावडर १/४ टी. स्पून, दूध गरजेनुसार, मार्गारिन ९० ग्रॅ., अंडी २, व्हॅनिला इन्सेस १/४ टी. स्पून

कृती :

८ इंचाचा केक टीन ग्रीस आणि डस्ट करून घ्या. मैदा व बेकिंग पावडर चाळून घ्या. मार्गारिन व गूळ यांची हलकी पेस्ट करून घ्या. या मिश्रणात अंडी एकेक करून टाका व हे मिश्रण दूध घालून फेटा. मैदा फोल्ड करा व चमच्याने पडेपर्यंत मिश्रण दूध घालून फेटा. तयार केलेल्या टीनमध्ये मिश्रण घाला व २०-२५ मि. बेक करा.

...

चॉकलेट केक

साहित्य :

मैदा ११५ ग्रॅ., ८५ ग्रॅ. गुळाची पावडर, बेकिंग पावडर १/२ टी.स्पून, मार्गारिन ५५ ग्रॅ., अंडी २, कोको पावडर, २ टे. स्पून, मीठ १/४ टी.स्पून, खाण्याचा सोडा १/२ टी.स्पून, चॉकलेट इसेन्स काही थेंब, दूध आवश्यकतेनुसार.

कृती :

मैदा, बेकिंग पावडर, कोको पावडर व मीठ चाळून घ्या. दुधामध्ये सोडा विरघळवा. बटर व गूळ हे मिश्रण हलके होईपर्यंत फेटा. या मिश्रणात इसेन्स घाला. सर्व कोरडे साहित्य गरजेनुसार दूध घालून चमच्याने पडेल असे तयार करा. हे मिश्रण ग्रीस केलेल्या व लाईन केक टीनमध्ये ओता. २०-२५ मि. बेक करा.

टिप : सोडा न घालत देखील हा केक बनवू शकता.

...

खजूर व अक्रोड केक

साहित्य :

मैदा ११५ ग्रॅ., ११५ ग्रॅ. गुळाची पावडर, बेकिंग पावडर १/२ टी.स्पून, मार्गारिन ९० ग्रॅ., अंडी २, बिनबियाचा खजूर – १०० ग्रॅम, अक्रोड - ५०ग्रॅम, व्हॅनिला इन्सेन्स – १/४ टी. स्पून, दूध आवश्यकतेनुसार.

कृती :

मैदा, बेकिंग पावडर व सोडा चाळून घ्या. बटर, गूळ हलके होईपर्यंत फेटा. अंडी स्वतंत्रपणे फेटा व वरील मिश्रणात हळुहळू घालून मिश्रण फेटा. या मिश्रणात व्हॅनिला इन्सेस घाला. मैद्यात तुकडे केलेले खजूर व अक्रोड एक आड एक घालून फोल्ड करा. आवश्यकतेनुसार दूध घालून चमच्याने पडेल असे मिश्रण तयार करा. हे मिश्रण लाईन्ड केक टीन मध्ये ओतून ४० ते ४५ मिनिटे ठेवा.

...

पायनापल अप-साईड डाऊन

साहित्य :

पाव कप बटर, अर्धा कप गुळाची पावडर, १ कॅन पायनापलचे तुकडे, २ अंडी, अर्धा कप पायनापल ज्यूस, ९ टे.स्पून केक मिक्स.

कृती :

बटर व गूळ एकत्र करून गूळ वितळेपर्यंत गॅसवर ठेवा व चांगले ढवळा. केक मिक्स, पायनापल ज्यूस व फेटलेले अंडे एका बाऊलमध्ये घेऊन चांगले ढवळा. नंतर हे मिश्रण मिक्सरमधून काढा. तयार केलेल्या केकटीनमध्ये तळाला पायनापलच्या रिंग्ज पसरा व त्यावर हे मिश्रण ओता. १० मि. बेक करा. नंतर पुन्हा हा केक खालची बाजू तर करून १०-१५ मि. बेक करा.

...

मार्बल केक

साहित्य :

मैदा १५० ग्रॅ., साय काढलेले दूध २०० मि.लि., १५० ग्रॅ. गुळाची पावडर, बटर १०० ग्रॅ., सोडा १/२ टी.स्पून, बेकिंग पावडर १ टी.स्पून, व्हॅनिला इसेन्स १ टी.स्पून, कोको पावडर २ टी.स्पून, पाणी आवश्यकतेनुसार.

कृती :

मैदा, बेकिंग पावडर व सोडा चाळून घ्या. बटर, गूळ, दूध हलके होईपर्यंत फेटा. वरील मिश्रणात मैदा, इसेन्स मिक्स करा. सर्व साहित्य गरजेनुसार दूध घालून चमच्याने पडेल असे तयार करा. वरील मिश्रणात दोन भाग करा. एका भागात कोको पावडर घाला. ह्या एका भागाचा व कोको पावडर न घातलेल्या दुसऱ्या भागाचा केक टीनमध्ये एकावर एक थर घाला. वरील मिश्रण एकदाच चमचा फिरवून ढवळा. ३६ मि. बेक करा.

...

कोकोनट कुकीज

साहित्य :

मैदा ८५ ग्रॅ., मार्गारिन किंवा बटर ५५ ग्रॅ., डेसिकेटेड कोकोनट ४० ग्रॅ., गुळाची पावडर ५५ ग्रॅ., पाणी २ टी.स्पून.

कृती :

मार्गारिन व गूळ हलके होईपर्यंत फेटा व या मिश्रणात २ टी.स्पून पाणी घाला. मैदा चाळून घ्या वरील मिश्रणात घाला. तसेच डेसिकेटेड कोकोनट घाला व नीट ढवळा. तुम्हाला आवडेल तो आकार कुकीजला द्या व ह्या बेकिंग टीनमध्ये नीट ठेवा. १६ मि. बेक करा.

...

चॉकोलेट कुकीज

साहित्य :

मैदा ११५ ग्रॅ., मार्गारिन किंवा बटर ६० ग्रॅ., व्हॅनिला इसेन्स १/२ टी.स्पून, गुळाची पावडर ६०ग्रॅ., बेकिंग पावडर १/२ टी.स्पून, कोको पावडर १ टे.स्पून, गोल्डन सिरप १ टे.स्पून.

कृती :

मैदा व कोको पावडर एकत्र चाळून घ्या. मार्गारिन व गूळ हलके होईपर्यंत फेटा. वरील मिश्रणात व्हॅनिला इसेन्स व गोल्डन सिरप घालून नीट ढवळा. त्यात मैदा घाला व नीट ढवळा. तुम्हाला आवडेल तो आकर कुकीजला द्या व ह्या कुकीज बेकिंग टीनमध्ये नीट ठेवा. २० मि. बेक करा.

...

बदाम – पिस्ता कुकीज

साहित्य :

मैदा ११५ ग्रॅ., मार्गारिन किंवा बटर ५० ग्रॅ., गुळाची पावडर ५०ग्रॅ., वेलदोड्याची पूड १/४ टी.स्पून, जायफळ पूड १/४ टी.स्पून, बारीक केलेले बदामाचे तुकडे १ टी.स्पून, चिमूटभर केशर, दूध आवश्यकतेनुसार

कृती :

मैदा चाळून घ्या. मार्गारिन व गूळ हलके होईपर्यंत फेटा. वरील मिश्रणात केशर, जायफळ पूड व वेलदोड्याची पूड घालून नीट ढवळा. त्यात मैदा घाला व त्याचा गोळा बनवा. तुम्हाला आवडेल तो आकार कुकीजला द्या व बदाम – पिस्त्याचे तुकडे त्यावर पसरवा. त्या कुकीज बेकिंग टिनमध्ये नीट ठेवा. १६. मि. बेक करा.

...

चोको – काजू कुकीज

साहित्य :

मैदा ८५ ग्रॅ., मार्गारिन किंवा बटर ८५ ग्रॅ., गुळाची पावडर ८५ ग्रॅ., वेलदोड्याची पूड १/४ टी.स्पून, काजूची पूड ८५ ग्रॅ., बदाम इसेन्स १/४ टी.स्पून, कोको १ टी.स्पून

कृती :

मैदा चाळून घ्या. मार्गारिन व गूळ हलके होईपर्यंत फेटा. वरील मिश्रणात बदामाचा इसेन्स घालून नीट ढवळा. वरील मिश्रणात मैदा, कोको व काजूचे पूड घाला व त्याचा गोळा बनवा. हे मिश्रण थंड करून तुम्हाल आवडेल तो आकार कुकीजला द्या. ह्या कुकीज बेकिंग टीनमध्ये नीट ठेवा १८ मि. बेक करा.

...

व्हॅनिला कुकीज

साहित्य :

३ वाट्या मैदा, दीड वाटी गुळाची पावडर, ४ टे.स्पून लोणी, २ टे.स्पून ताक, २ अंडी, पाव टी.स्पून सोडा, पाव टी.स्पून बेकिंग पावडर, ५ टे.स्पून कॉन फ्लोअर, १ टे.स्पून डाळीचे पीठ, पाव टी.स्पून मीठ, ४ टे.स्पून सुके खोबरे, अर्धा टी.स्पून व्हॅनिला इसेन्स.

कृती :

मैदा डाळीचे पीठ, बेकिंग पावडर व कॉर्न फ्लोअर हे सर्ब एकत्र करून चाळा. मीठ व लोणी व गूळ एकत्र करून फेटा. फेटलेले अंडे घालून वरील मिश्रण फेटा. त्यात ताक घाला व पुन्हा चाळलेले मिश्रण घालून फेटा. खोबरे घाला व मिल्क पावडर घालून सर्व एकत्र घालून मळा व गोळा तयार करा. पोळपाटावर मैदा घालून पुरी इतकी जाड पोळी लाटा व आपल्याला हव्या त्या आकाराच्या कुकीज बनवा. ह्या कुकीज लांब अंतरावर ठेवा व १५ मि. बेक करा.

...

कैरीचे पन्हे

साहित्य :

उकडून कैरीचा २ वाट्या गर, २॥ वाट्या गूळ, १॥वाटी पाणी, पाव टीस्पून पोटॅशियम मेटॅ-बाय सल्फेट

कृती :

साल न काढता कैऱ्या वाफवून घ्या. कैरीचा गर काढा. मिक्सरमधून गर गाळून घ्या. गूळ व पाणी एकत्र करून एक उकळी आणा व थंड करून काढलेला गर त्यात घाला व ढवळा. पोटॅशियम मेटॅ-बाय सल्फेट घाला. वेलदोड्याची पूड घालून ढवळा. पन्हे देताना १ भार पन्हे व ३ भाग पाणी घालून द्यावे.

...

मॅंगो शेक

साहित्य :

१ वाटी हापूस आंब्याच्या फोडी किंवा मॅंगो पल्प, ६ ग्लास दूध, ८ टे. स्पून गूळ

कृती :

वरील सर्व साहित्य एकत्र करा व ज्यूसर मधून काढा. खूप फेस येईपर्यंत मिश्रण चांगले फिरवा. थंडगार प्यायला द्या.

...

उकडीचे मोदक

साहित्य :

२ मोठे नारळ खोवून घ्यावे. ३ वाट्या गूळ, अर्धा टीस्पून जायफळ पूड, आंबेमोहोर तांदळाची ६ वाट्या पिठी, उकड काढण्याकरिता ५॥ वाट्या पाणी, १ टे. स्पून लोणी, अर्धा टी.स्पून मीठ.

कृती :

गूळ व नारळ एकत्र करुन मंद आचेवर शिजायला ठेवा. सारणाचा ओलेपणा जाईपर्यंत मिश्रण सारखे ढवळा. खमंग वास येईल व पातेल्याचा तळ दिसू लागेल. असे झाले की पातेले खाली उतरवा व जायफळाची पूड घाला व ढवळून झाकून ठेवा. असे सारण आदल्या दिवशी रात्री करून नीट झाकून ठेवावे.

उकड :

पाण्याला आधण आले की, लोणी व मीठ घाला व मिश्रणाला उकळी आली की, पिठी वैरा व लाटण्याने घोटा; त्यामुळे गुठळी होत नाही. गॅस बारीक करा व २-३ मंद वाफा आणा (झाकण ठेवून) गरम असतानाच तुपाचा हात लावून सर्व उकड मळून ठेवा व पातेल्यात झाकून ठेवा. एकेक गोळा बाहेर काढून परत मळा.

मळताना तुपाचा हात लावा. मोठ्या सुपारीएवढा गोळा घेऊन, त्याची पारी करा. करताना डाव्या हाताच्या अंगठ्याने पारी खोल करा व उजव्या हाताच्या बोटांनी पारी पातळ करा. त्यात २ टीस्पून तयार सारण घाला. अंगठ्याजवळच्या बोटाचे अंतर ठेवून निऱ्या करा व तोंड बंद करून मोदकाची जास्तीची उकड बाजूला काढा. एका मोठ्या पातेल्यात आधण ठेवा. त्यावर चाळणी ठेवा. त्यात स्वच्छ फडके भिजवून घाला. दुसऱ्या पातेलीत गार पाणी घ्या व ८-१० मोदक त्या गार पाण्यात बुडवून चाळणीत उकडायला ठेवा. १५ मिनिटे मोदक उकडा. उकडताना वर झाकण ठेवा. घट्ट तुपाबरोबर खायला द्या.

...

भोपळ्याचे घारगे

साहित्य :

अर्धा किलो भोपळा, ३ वाट्या गूळ, १ वाटी तांदळाची पिठी, रवाळ कणीक ४ वाट्या, अर्धी वाटी तेल, १ टीस्पून मीठ, तेल तळण्यासाठी.

कृती :

भोपळा किसून घ्या व थोड्या तेलावर टाकून वाफवून घ्या. गूळ घाला व मीठ घाला. गूळ विरघळला की, १ कढ आणा व खाली उतरवा. गरम असतानाच त्यात तांदळाची पिठी व कणीक घालून ढवळा व झाकून ठेवा. नंतर पुरीपेक्षा जाड वडे थापा व तेलात तळून काढा.

...

गुळाचा सांजा

साहित्य :

२ वाट्या जाड रवा, २ वाट्या गूळ, अर्धी वाटी साजूक तूप, ५ वाट्या दूध, ५/७ वेलदोड्यांची पूड, पाव टीस्पून मीठ.

कृती :

तूप घालून रवा चांगला भाजा. एका पातेल्यात ४ वाट्या पाणी उकळायला ठेवा. मीठ घाला. उकळते पाण्यात भाजलेला रवा घाला व २ वाफा आणा. चिरलेला गूळ घाला. मिश्रण चांगल्यापैकी ढवळून घ्या व परत दोन-तीन वाफा आणा. वेलदोड्याची पूड घालून ढवळा व गरम गरम खायला द्या.

...

सांज्याची पोळी

साहित्य :

२ वाट्या गव्हाचा रवा, ३ वाट्या गूळ, पाव टीस्पून तूप, ५ वाट्या दूध, अर्धा टीस्पून वेलदोडा पूड.

कृती :

तुपावर रवा चांगला भाजा. खमंग वास आला की आधणाचे पाणी घाला. २ वाफा आणा. गूळ व मीठ घाला. मिश्रण ढवळून २ वाफा आणा. खाली उतरवा. वेलदोडा पूड घाला व गरम असतानाच मळून घ्या. ३ वाट्या कणीक मोहन न घालता गार पाण्यात भिजवा व पुरणपोळीप्रमाणेच उंडा तयार करा. पिठी लावून पोळी लाटा व तूप सोडून खमंग भाजा.

...

दशमी

साहित्य :

१ वाटी दूध, ३-४ टे. स्पून गूळ, कणीक, मोहन २-३ टे. तेल, तूप वर सोडण्यासाठी

कृती :

दुधात गूळ पूर्ण विरघळन घ्या व त्यात मावेल एवढी कणीक व मोहन घालून पोळी लाटून घ्या. वर तूप सोडून खमंग भाजा. या पोळ्या ८ दिवस प्रवासात टिकतात.

...

खांडवी

साहित्य :

तांदुळाचा रवा (कण्या) १ वाटी, गुळाची पावडर दीड वाटी, नारळाचं दूध १ वाटी, पाणी १ वाटी, आलं किसून २ टी. स्पून, तूप, ओलं खोबरं १/२ वाटी.

कृती :

तांदूळ धुवून सावलीत वाळवून घ्या व त्याच्या कण्या काढून घ्या. कण्या मंद आचेवर भाजून घ्या. नंतर त्यात पाणी व नारळाचे दूध घाला. मंद वाफ आणा. मग त्यात गुळाची पावडर व आलं घालून ढवळून पुन्हा एकदा मंद वाफ आणा. एका ताटाला तूप लावून घ्या व त्यावर पसरून वड्या कापा. ओल्या खोबऱ्याने सजवा. तुपाबरोबर खायला द्या.

...

गुळ – पापडीच्या वड्या

साहित्य :

२ वाट्या जाडसर रवाळ कणीक, पाव वाटी भाजलेले तीळ, अर्धी वाटी भाजून कुस्करलेले खोबरे , १ वाटी गुळाची पावडर, दीड टे.स्पून पाणी, अर्धी वाटी तूप कणीक भाजण्यासाठी, जायफळ पावडर.

कृती :

तूप घालून कणीक खमंग भाजून घ्या, त्यात तीळ, खोबरे व जायफळ पूड मिसळून घ्या. गुळाची पावडर व पाणी एकत्र करुन पाक करायला ठेवा. पाकाचा खमंग वास येईल व कोरड्या हाताला पाक चिकट लागला की पातेले खाली उतरून भाजलेले मिश्रण घाला. नंतर थाळीत तूप लावून मिश्रण ओता व लगेच वड्या कापा. थंडीच्या दिवसात लहान मुलांना द्यायला या वड्या पौष्टिक आहेत.

...

दाण्याची वडी

साहित्य :

१ वाटी दाण्याचे कूट, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा भाजलेला कीस, २ टे.स्पून भाजून कुटलेली खसखस, दीड वाटी गुळाची पावडर, १ टी.स्पून पाकाकरिता पाणी, पाव टी.स्पून जायफळ पावडर, पोळपाट-लाटण्याला तुपाचा हात लावून घेणे.

कृती :

गुळाची पावडर व पाणी एकत्र करून कोरड्या हाताला चिकट लागणारा पाक करा. खसखस, खोबरे, जायफळ पूड व दाण्याचे कूट तकत्र करून पाकात घाला. मिश्रण गरम आहे तोवर ढवळून तूप लावलुएल्या पोळ्पाटावर वड्यांचे मिश्रण लाटा व गरम असतानाच वड्या कापा. अंदाजे १५-२० वड्या होतात.

...

छुंदा

साहित्य :

कैरी किसलेली १ वाटी, गूलाची पावडर सव्वा वाटी (कैरीच्या आंबटपणाप्रमाणे कमी-जास्त गूळ घेणे), फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ.

कृती :

प्रथम किसलेल्या कैरीत मीठ व लाल तिखट घालून एकत्र करुन घ्या. कढईत तेलाची फोडणी करुन त्यात गुळाची पावडर घालणे व सतत ढवळत रहाणे. गूळ वितळला की लगेच गॅस बंद करून किसलेल्या कैरीचे मिश्रण त्यात घाला.

...

मेथांबा

साहित्य :

कैरीच्या फोडी १ वाटी, गुळाची पावडर सव्वा वाटी, (कैरीच्या आंबटपणाप्रमाणे कमी-जास्त गूळ घेणे), फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट, मीठ, मेथी दाणे ७-८.

कृती :

प्रथम कैरीच्या फोडी वाफवून घेणे. कढईत तेलाची फोडणी करून त्यात मेथी दाणे व गुळाची पावडर घालणे व सतत ढवळत रहाणे. गूळ वितळला कि लगेच गॅस बंद करून कैरीच्या वाफवलेल्या फोडी त्यात घाला. नंतर मीठ व लाल तिखट घालून एकत्र करून घ्या.

...

गुळांबा

साहित्य :

१किलोकैरी, ज्यापातेलीनेकैरीच्याफोडीमोजूनघेतल्याअसतीलत्याचपातेलीने२पातेलीगूळ, १वाटीपाणीगुळाचापाककरण्याकरिता, १०/१५वेलदोड्यांचीपूड

कृती :

कैरीच्या फोडी वाफवून गार करून घ्या. गूळ व पाणी एकत्र करून चिकट होणारा पाक करा. वाफवलेल्या फोडी पाकात घाला व २चट द्या व खाली उतरवा. गार झाल्यावर वेलदोड्याची पूड घाला.